दरबार ते डिजिटल: AI च्या युगात शास्त्रीय संगीताची नवी कसौटी
आज जगभर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) बद्दल चर्चा सुरू आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, वित्तव्यवस्था आणि संप्रेषण अशा अनेक क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान वेगाने बदल घडवत आहे. पण या तंत्रज्ञानाचा भारतीय शास्त्रीय संगीतावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, हा प्रश्न अजून गंभीरपणे विचारला गेलेला दिसत नाही. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या संगीत प्रणालीसमोर आज एक नवा टप्पा उभा आहे — तंत्रज्ञानाशी संवाद साधण्याचा टप्पा.
भारतीय शास्त्रीय संगीत ही केवळ एक कला नाही; ती भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राग, ताल, घराणी, गुरू-शिष्य परंपरा आणि साधना यांच्या माध्यमातून ही परंपरा शतकानुशतके जपली गेली आहे. एकेकाळी हे संगीत राजदरबारांमध्ये सादर होत असे. पुढे ते सार्वजनिक मैफिली, रेडिओ, ध्वनिमुद्रिका आणि दूरदर्शन या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचले. आज आपण ज्या काळात आहोत तो डिजिटल युग आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रवास दरबार ते डिजिटल असा झालेला दिसतो.
या पार्श्वभूमीवर AI या तंत्रज्ञानाची चर्चा करताना एक मूलभूत गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. AI ही मूलत: मशीन भाषा (machine language) आहे. ती स्वरांचे नमुने ओळखू शकते, तालाचे गणित समजू शकते आणि संगीताच्या संरचनेचे विश्लेषण करू शकते. परंतु भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा असलेले रस आणि भावना, मशीनला समजणे शक्य नाही. रागातील करुणा, शांतता, भक्ती किंवा विरह ही अनुभूती कलाकाराच्या अंतःकरणातून व्यक्त होते. ती साधना, अनुभव आणि संवेदनशीलतेतून निर्माण होते; ती केवळ अल्गोरिदम (Algorithm) मधून निर्माण होऊ शकत नाही.
याच कारणामुळे लाईव्ह मैफलीचा अनुभव भारतीय शास्त्रीय संगीताचा केंद्रबिंदू राहिला आहे. कलाकार आणि रसिक यांच्यातील जिवंत संवादातून संगीताला नवे आयाम मिळतात. कधी श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे रागाचा विस्तार वेगळ्या दिशेने जातो, तर कधी त्या क्षणातील भावनेतून एखादा स्वर अनपेक्षितपणे खुलतो. या जिवंत संवादातून निर्माण होणारा अनुभव कोणतेही तंत्रज्ञान पूर्णपणे पुनरुत्पादित करू शकत नाही. त्यामुळे AI कितीही प्रगत झाले तरी मैफलीचा जिवंत अनुभव हा नेहमीच मानवी राहणार आहे.
तथापि, बदलत्या काळात तंत्रज्ञानाकडे पूर्णपणे पाठ फिरवणेही योग्य ठरणार नाही. आजच्या पिढीचे संगीताशी असलेले नाते मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. तरुण पिढी संगीताचा शोध प्रामुख्याने मोबाईल अॅप्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि AI आधारित शिफारसी यांच्या माध्यमातून घेते. एखाद्या श्रोत्याला आपल्या मनःस्थितीनुसार संगीत ऐकायचे असेल, तर डिजिटल प्रणाली त्याला तत्काळ पर्याय सुचवतात. त्यामुळे संगीताचा अनुभव आणि त्याचे वितरण पूर्णपणे नव्या स्वरूपात विकसित होत आहे.
या परिस्थितीत भारतीय शास्त्रीय संगीत समुदायासमोर एक महत्त्वाचे आव्हान उभे राहते. आजच्या डिजिटल जगात संगीताचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर डेटा वर अवलंबून असते आणि ज्या प्रकारच्या संगीताचा डेटा अधिक प्रमाणात उपलब्ध असतो त्यांनाच अल्गोरिदम अधिक पुढे आणतात. वास्तुस्थिती अशी आहे की भारतीय शास्त्रीय संगीत अजूनही डिजिटायझेशनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर मागे आहे. अनेक राग, बंदिशी, परंपरा आणि मैफिलींचे व्यवस्थित डिजिटल जतन आजही झालेले नाही. त्यामुळे जर आपल्या शास्त्रीय संगीताचे सुसंगत डिजिटल दस्तऐवजीकरण (documentation) झाले नाही, तर भविष्यातील डिजिटल प्रणालींमध्ये त्याचे प्रतिनिधित्व कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतासाठी सक्षम डिजिटल पायाभूत रचना उभी करणे ही आता काळाची गरज आहे.
येथे एक महत्त्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. भारतीय परंपरेत ज्ञानाची परंपरा गुरू-शिष्य संबंधातून पुढे चालत आली आहे. त्या दृष्टीने पाहिले तर AI कडेही एका अर्थाने शिष्य म्हणून पाहता येईल. परंतु प्रत्येक शिष्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. जर AI ला चुकीचा किंवा अपूर्ण डेटा दिला गेला — किंवा AI ने उपलब्ध स्रोतांमधून अशा प्रकारचा अपूर्ण किंवा चुकीचा डेटा गोळा केला — तर भविष्यातील पिढीला शास्त्रीय संगीताचे चुकीचे किंवा अपूर्ण स्वरूप शिकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि असे झाले तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे तसेच भारतीय शास्त्रीय संगीताच्या व्याकरणाचे नुकसान होण्याची भीती आहे, कारण पुढील पिढी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर AI आधारित मॉड्यूल्स मधून करण्याची शक्यता आहे.
म्हणूनच भारतीय शास्त्रीय संगीत समुदायाने या प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे. संगीतकार, गुरू आणि संशोधक यांनी पुढाकार घेऊन AI विकसित करणाऱ्या तंत्रज्ञांशी संवाद साधला, तर भारतीय शास्त्रीय संगीतासाठी विश्वसनीय आणि प्रामाणिक डेटा आधारित AI मॉड्यूल तयार होऊ शकते. हे केवळ तांत्रिक प्रयोग न राहता आपल्या परंपरेच्या जतनासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
AI च्या मदतीने रागांच्या स्वर संरचनेचे विश्लेषण, विविध घराण्यांतील शैलींचा अभ्यास, तसेच जुन्या ध्वनिमुद्रणांचे पुनर्संचयन (restoration) करणे शक्य आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातही AI उपयोगी ठरू शकते. विद्यार्थ्यांना रागांचे स्वरूप समजावून देणे, स्वरांची अचूकता तपासणे किंवा अभ्यासासाठी सहाय्यक साधने उपलब्ध करून देणे या बाबतीत ते मदत करू शकते. याचा अर्थ असा अजिबात नाही की संगीत गुरू अप्रासंगिक ठरतील, कारण कोणतीही मशीन गुरू किंवा शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही.
या सर्व प्रक्रियेत एक समतोल राखणे आवश्यक आहे की AI हे साधन आहे; परंपरेचा पर्याय नाही. गुरू-शिष्य परंपरा, रियाज, साधना आणि लाईव्ह मैफली यांवर भारतीय शास्त्रीय संगीताची पायाभरणी झाली आहे. या मूलभूत तत्त्वांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.
आज प्रश्न असा नाही की AI येणार का? कारण तो आधीच आपल्या जगात आला आहे. खरा प्रश्न असा आहे की भारतीय शास्त्रीय संगीत समुदाय या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्यासाठी कसा करणार.
तंत्रज्ञानातील बदल स्वीकारत आणि भारतीय शास्त्रीय संगीताची शुद्धता जपत ते पुढील पिढीपर्यंत सुसंगत आणि समृद्ध स्वरूपात पोहोचवणे हीच आजच्या संगीतकारांची खरी जबाबदारी आहे.
______________________________________________________________________________
डॉ. रतिश तागडे
व्हायोलिन वादक, ‘Insync’ २४x७ भारतीय शास्त्रीय संगीत वाहिनीचे संस्थापक आणि सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक (CRPIM) चे अध्यक्ष.